काळी मुसळी ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. पावसाळ्यातले काही दिवस दगडांच्या फटीतून ही रुजून आलेली दिसते. गावातील गिरेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ही आढळून आली आहे. कांद्याच्या पात्यांसारखी जमिनीलगत असणारी पाने आणि बारीक पिवळी फुले यावरून ही वनस्पती ओळखता येते.
या वनस्पतीचा अणसुरे गावात औषध म्हणून फारसा वापर अलीकडे होत नसला तरी काळी मुसळी ही भारतात सर्वत्र एक अत्यंत औषधी वनस्पती म्हणून परिचित आहे. आयुर्वेदात या वनस्पतीचे विविध औषधी गुणधर्म सांगितले आहेत. या वनस्पतीचे मूळ शरीराच्या जोपासनेसाठी आणि विविध विकारांवर उगाळून दिले जाते. अनेक ठिकाणी औषधासाठी हिची लागवड करतात. भारतात हिमालयाच्या भागात ही जास्त करून आढळते. अलीकडे ही वनस्पती सर्वत्र दुर्मिळ होत चालली आहे.