अणसुरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या दक्षिण टोकाला, विजयदुर्ग किल्ल्याच्या समोर समुद्रकिनारी वसलेले गाव आहे. रत्नागिरी शहरापासून ६० किमी अंतरावर, राजापूर शहरापासून ३५ किमी, देवगडपासून ३० किमी, तर विजयदुर्गापासून ३० किमी अंतरावर अणसुरे गाव येते. गावाचे क्षेत्रफळ ९८७.८१ हेक्टर असून लोकसंख्या २३९० (२०११ च्या जनगणनेनुसार) एवढी आहे.
अणसुरे गावाच्या पश्चिम दिशेला समुद्रकिनारा असून उत्तर आणि दक्षिण दिशांना खाडी आहे. पश्चिमेकडे बाकाळे, दांडे; दक्षिणेकडे शिर्से, सागवे, बुरुंबे; पूर्वेकडे गोठीवरे, साखर, कोंबे व उत्तरेकडे जानशी, पठार, निवेली, तिवरांबी ही गावे येतात. गावाचा विस्तार पश्चिम-पूर्व आहे. गिरेश्वर टेकडी हे अणसुरे गावाचे सर्वात उंच ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ७० मीटर आहे. गावाच्या पश्चिम बाजूला समुद्र असून दक्षिण व उत्तर दिशांना खाडी आहे. गावाची पश्चिम-पूर्व लांबी सुमारे ६ किलोमीटर असून उत्तर दक्षिण रुंदी सुमारे १.५ ते २ किमी आहे.
