कलमी आंबा

कोकणाचा राजा असलेला ‘हापूस आंबा’ हे गावातले सर्वाधिक लागवड असलेले आणि सर्वाधिक उत्पन्न असलेले बागायती पीक आहे. गावात हापूस आंब्याची १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी झाडेही आहेत, मात्र बहुतांश हापूस लागवड ही गेल्या २० ते ४० वर्षांतील आहे. हापूसच्या बागा या मुख्यतः डोंगरउतारावर आढळतात व काही प्रमाणात कातळसड्यांवर देखील लोकांनी बागा केल्या आहेत. एका बागेचे क्षेत्र हे साधारणपणे १ ते ३ एकरांपर्यंत असते. बागांमध्ये हापूसच्या कलमांची एकपीक पद्धतीने लागवड आढळते. जुन्या कलमांची उंची ४० फुटांपर्यंत, तर नव्या कलमांची उंची १० ते २० फुटांपर्यंत असते. साधारणपणे मार्च ते मे हा हापूसचा हंगाम असतो. काही बागायतदार स्वतः आंब्याच्या पेट्या भरून वाशी मार्केटला पाठवतात, तर काही लोक व्यापाऱ्यांना हंगामी वा दोन वर्षे, पाच वर्षे अशा कालावधीसाठी कराराने देतात. कलमे कराराने घेणारे गावातलेच स्थानिक व्यापारी आहेत, तर काही बाहेरचे व्यापारीही येतात. कलमांचा करार तोंडी केला जातो व तो पाळला जातो. बहुतांश व्यापाऱ्यांकडून कराराची रक्कम बागायतदारांना आगाऊ दिली जाते. काही बागायतदार मोहोर आल्यावर बाग कराराने देतात, तर काही आंबे तयार झाल्यावर देतात. दीर्घ काळासाठी कराराने घेतलेल्या बागेची देखभाल व्यापारीच करतात.

पूर्वी गावातला बहुतांश आंबा हा वाशी मार्केटला पाठवला जाई, मात्र अलीकडे मुंबई, पुणे, गोवा इ. शहरांमध्ये थेट ग्राहकांना आंबा पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-गोवा सागरी महामार्ग गावातूनच जात असल्याने व खासगी बसेसची उपलब्धता वाढल्याने आंबा वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पूर्वी आंबा पॅकिंगसाठी लाकडी खोके वापरले जात. त्यासाठी रायवळ आंबा, मोवई, शिवण, इ. झाडांच्या फळ्या वापरल्या जात. मात्र अलीकडे लाकडी खोक्यांचे प्रमाण कमी झाले असून पुठ्ठ्याच्या खोक्यांचा सर्रास वापर केला जातो. आंबा झाडावरून काढण्यासाठी बांबूच्या काठीचा ‘घळ’ वापरला जातो. आंबा काढणीसाठी झाडावर चढणारे गडी मिळणे ही गावात एक समस्या आहे. मात्र झाडावर चढण्यात तरबेज असणाऱ्या गावातल्या काही मोजक्या लोकांना सुमारे दोन महिने हुकुमी रोजगार असतो.

गावातले काही अत्यल्प बागायतदार घरी आंबा पिकवून त्यापासून साट, आटवलेला रस, इ. उत्पादने बनवतात. आमरसाच्या बाटल्या भरण्याचा उद्योग गावात कोणाकडेही नाही. आंबा पिकवण्यासाठी भातियण गवताची ‘आढी’ घातली जाते. पिकलेला हापूस आंबा, आमरस हा गावातल्या लोकांचा उन्हाळी हंगामातला एक आवडता खाद्यपदार्थ आहे. आंब्याच्या साली गुरांना खायला घालतात, कोया टाकून दिल्या जातात.

आंब्याची नवीन कलमे करण्याच्या ‘कोय-कलम’, ‘भेट-कलम’, ‘खुंटी कलम’ अशा काही पारंपरिक पद्धती गावातल्या लोकांना ज्ञात आहेत. हापूसबरोबरच पायरी, राजापुरी, आंबी, भोपळी आंबा अशा काही अन्य जातींची कलमे लोकांनी हौस म्हणून लावली आहेत.

पूर्ण सेंद्रिय पद्धतीने आंबा बागायती करणारे बागायतदार गावात अत्यंत तुरळक आहेत. बहुतांश आंबा बागायतदार व व्यापारी कल्टार, युरिया, इ. रासायनिक खते, टॉनिके, कीटकनाशके यांचा भरपूर प्रमाणात वापर करतात.

आटवलेला रस
आंबा साट
पायरी आंबा
राजापुरी
Share Tweet Follow Share Email Share