बेल (Aegle marmelos)

बेलाची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते १५ फूट) गावात तुरळक प्रमाणत आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. अनेक लोकांनी आपापल्या परसदारी, घराच्या बाजूला बेलाची एक-दोन झाडे जपलेली आढळतात. बाकी गावात इतरत्र जंगली भागांत बेलाची झाडे सहसा आढळलेली नाहीत. बेलाचे खोड पांढरट तपकिरी रंगाचे, काही प्रमाणात काटे असलेले असते व पाने लहान आकाराची त्रिदलात असतात. बेलाला चेंडूसारखी गोल हिरवट कठीण कवचाची फळे येतात. गावात बेलफळांचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग फारसा केला जात नाही. पंगेरेवाडी येथे बेलाच्या फळांनी लगडलेला एक छोटा वृक्ष नजरेस पडतो.

बेलाच्या झाडाला धार्मिक महत्त्व खूप आहे. शंकराच्या पूजेत बेलाची पाने वाहिली जातात. तसेच गणेशपत्रींमध्येही बेलाचा समावेश आहे. जगात बेलाच्या तीन जाती नोंदवलेल्या असून भारतात एकच जात सापडते. भारतासह श्रीलंका, म्यानमार, इ. आशियायी देशांमध्ये बेलाची झाडे आहेत. मात्र अलीकडे या वृक्षांची संख्या कमी झाल्याने जागतिक स्तरावर ‘दुर्मिळ वृक्ष’ म्हणून त्याची गणना झाली आहे. संस्कृतमध्ये हा वृक्ष ‘बिल्व’, ‘त्रिपत्रक’, इ. नावांनी ओळखला जातो. बेलफळातील गर हा अतिशय औषधी आहे. अनेक ठिकाणी त्याचा मुरंबा केला जातो. पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बेलफळ उपयुक्त आहे. लाकूड विविध हलक्या कामांसाठी उपयोगी येते.

बेलफळ
Share Tweet Follow Share Email Share