भावकाईची राई

अणसुरे गावात खालच्या वठारातील वाडेकरवाडी येथे ‘भावकाई’ नावाचे जुने देवस्थान आहे. येथे छोटे मंदिर उभारलेले आहे. या मंदिराच्या आजूबाजूच्या सुमारे तीन ते चार गुंठे परिसरात एक देवराई पाहायला मिळते. 

येथे एक पायरीचा व एक पिंपळाचा असे दोन महावृक्ष आहेत. याशिवाय सुरंगीची ११, आष्ट्याची २, वडाचे १, बकुळीची २, सळसळ्याचे १, चिंचेची २ अशी वृक्षराजी येथे आढळते. भर दुपारीही गर्द सावली असणारे असे हे ठिकाण आहे. देवस्थान असल्यामुळे जुनी वृक्षराजी जपली गेली आहे. 

अणसुरे गावचे ग्रामस्थ यशवंत गावकर व मोहन गावकर, तसेच अन्य ग्रामस्थ या देवस्थानची देखभाल करतात. दरवर्षी होळीच्या दिवशी गावकऱ्यांकडून येथे नारळ ठेवला जातो. भावकाई ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असून अनेक ग्रामस्थ कौल लावण्यासाठी या देवस्थानला भेट देतात. ग्रामस्थांच्या सहभागाने या देवराईचे जतन-संवर्धन होणे गरजेचे आहे. 

Share Tweet Follow Share Email Share