भुईकोहळा  

(Ipomoea mauritiana)

भुईकोहळा ही गावात सामान्य प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. गुलाबी मोठ्या आकर्षक फुलांमुळे ही वनस्पती सहज ओळखू येते. गावातून पंगेऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला भुईकोहळ्याच्या वेली भरपूर प्रमाणात आढळतात. पाने चांदणीच्या आकाराची, साधारण तळहाताएवढी असतात. पावसाळा सुरु झाला की या वेली टरारतात आणि साधारणपणे ऑगस्टपासून ऑक्टोबरपर्यंत फुलतात. याची गुलाबी रंगाची मोठी फुलं लांबूनही सुंदर दिसतात. भुईकोहळ्याचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग अणसुरे गावात फारसा केला जात नाही, मात्र भुईकोहळा (जमिनीत असलेला कंद) हा उत्तम पशुखाद्य आहे असे गावातले जुनेजाणते लोक सांगतात. हा कंद गुरांना आंबवणात चाचवून घातल्यास गाई-म्हशी जास्त दूध देतात अशी माहिती स्थानिकांकडून मिळते. कंदातून पांढऱ्या रंगाचा चीक निघतो. म्हणून याला ‘दूधभुईकोहळा’ असेही म्हणतात. याला ‘महाबटाटा’ (Giant Potato) असेही म्हटले जाते. भुईकोहळ्याला संस्कृतमध्ये ‘क्षीरविदारीकंद’ असे नाव आहे. याची पाने, कंद आणि शेंग यांची काही ठिकाणी भाजी करून खाल्ली जाते. जगात जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये सर्वत्र ही वनस्पती आढळते. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचे विविध औषधी उपयोग सांगितले आहेत. 

जमिनीतून भुईकोहळा खणून काढताना ग्रामस्थ रमेश वाडेकर
भुईकोहळ्याची उंच गेलेली वेल (स्थळ: घोळ्यावर, पंगेऱ्याकडे जाणारा रस्ता)
भुईकोहळ्याचे पान
Share Tweet Follow Share Email Share