फणस ( Artocarpus heterophyllus)

फणसाची मध्यम व मोठया आकाराची झाडे गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळतात. फणसाचे गरे हे गावातल्या लोकांचे अतिशय आवडते खाद्य आहे. ‘कापा’ आणि ‘बरका’ अशा फणसाच्या दोन्ही जाती गावांत आढळतात. बरक्या फणसाची झाडे गावात तुलनेने जास्त आहेत, तर काप्या फणसाची झाडे तुलनेने कमी आहेत. गावातल्या फणसांच्या आकारांमध्ये व चवींमध्ये वैविध्य आढळते. फणसापासून ‘तळलेले गरे’ व ‘फणस पोळी’ ही व्यावसायिक उत्पादने गावात घेतली जातात. याशिवाय सांदण, गऱ्याचे पीठ, पुसभाजी, गऱ्यांची भाजी, घारग्याची आट, आठळ्यांची भाजी, हे घरगुती खाद्यपदार्थ फणसापासून बनवले जातात. चारखंडे गुरे आवडीने खातात. फणसाच्या पानांपासून पूर्वी गावात घरगुती उपयोगासाठी पत्रावळी बनवल्या जायच्या, परंतु अलीकडे फारशा बनवल्या जात नाहीत. फणसाचे साडीव लाकूड गावात इमारती बांधकामांसाठी वापरले जाते. फणसांचा वापर काही ठराविक लोकांकडूनच होत असल्यामुळे आणि सगळेच फणस तळलेले गरे वा साटे बनवण्यासाठी उपयोगी नसल्यामुळे बऱ्याच झाडांवरचे फणस कुसून पडून जातात. ते वन्यजीवांना खाद्य म्हणून उपयोगी येतात. उंच झाडांवरचे फणस काढून मिळणे ही एक समस्या असते.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/27524/)

     

फणस साट
Share Tweet Follow Share Email Share