स्थळ – भराडे
दि. ३१/१/२०२२
छायाचित्र – सुहास गुर्जर

गायबगळा (Cattle Egret)

 

बगळ्यांचे तीन ते चार प्रकार अणसुरे गावात आढळतात त्यापैकी ‘गायबगळा’ हा गावात सर्वत्र भरपूर प्रमाणात आढळणारा आणि नेहमी दिसणारा पक्षी आहे. याचा आकार मोठा, रंग पूर्ण पांढरा असून चोच पिवळी असते. विणीच्या हंगामात (मार्च ते मे) गायबगळ्याच्या मानेवर पिवळी पिसे येतात.

ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास अणसुरे खाडीत शेवडीवाडीजवळच्या कांदळाच्या बेटांवर १०० वा त्यापेक्षा जास्त संख्येने गायबगळे एकत्र बसलेले दिसतात. अणसुरे खाडीतील कांदळवन ही गायबगळ्यांची रात्रीच्या निवासाची आणि घरटी करण्याची खास जागा आहे.

गुरं ज्या ठिकाणी चरत असतात तिथे हे गायबगळे घिरट्या घालतात. गुरं चरताना त्यांचे पाय पडल्यामुळे जमिनीवरचे किडे, कीटक उड्या मारतात व त्यांना पकडण्यासाठी हे गायबगळे गुरांच्या अवतीभवती असतात. गुरांच्या अंगावरची गोचिडही हे काही प्रमाणात खातात.

गावात स्थानिक भाषेत या बगळ्यांना ‘ढोक’ असे म्हणतात.

Share Tweet Follow Share Email Share