काजू (Anacardium occidentale)

काजू हे गावातील एक मुख्य बागायती पीक आहे. घराच्या अवतीभवती, तसेच जंगलात थोड्या प्रमाणात काजूची लहान ते मध्यम उंचीची (१० ते ३० फूट ) झाडे आढळतात. गावात आडीवाडी ते वाकी या पट्ट्यात काजूच्या बागा विशेष करून आहेत.

‘गावठी काजू’ आणि ‘वेंगुर्ला काजू’ या काजूच्या कोकणात प्रामुख्याने आढळणाऱ्या दोन प्रजाती आहेत. गावठी काजूची झाडे गावात बऱ्यापैकी टिकून आहेत. लाल जांबाचा काजू आणि पिवळ्या जांबाचा काजू असे काजूचे दोन प्रकार गावात आढळतात. जानेवारीच्या सुमारास काजूच्या झाडाला फळे येतात. ओल्या काजूगरांची भाजी-आमटी गावात केली जाते. बिया सुकल्यानंतर निवडल्या जातात व काही दिवस उन्हात वाळत ठेवल्या जातात. त्यानंतर त्यांचे गर काढले जातात. चुलीत वा थाळीत थेट भाजून हाती गर काढण्याचे ज्ञान गावातील लोकांना आहे. अलीकडे फॅक्टरीतून गर काढून आणले जातात. सुक्या काजूबिया सध्या रु. १०० ते १२५ या दराने बाजारात विकल्या जातात. ओल्या व सुक्या काजूबियांची चोरीही गावात क्वचितप्रसंगी होते. जांबांपासून गावठी दारू पूर्वी गावात मोठ्या प्रमाणात काढली जायची. अलीकडे फारशी बनवली जात नाही. पिकलेले जांब गुरांना खायला घातले जातात वा फेकून दिले जातात. काजूच्या टरफलांचे तेल लाकूड टिकावू बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. गावात अलीकडे हे तेल काढले जात नाही. 

Share Tweet Follow Share Email Share