काळी मिरी
 

काळी मिरी हे गावात बागांमध्ये घेतले जाणारे आंतरपीक आहे. माड, पोफळी, आंब्याची झाडे यांवर मिरीचे वेल सोडतात. पावसाळ्यात पाळांना फुटलेले नवीन वेल दुसऱ्या ठिकाणी लावता येतात. लागवड केल्यापासून तीन वर्षांत मिरी धरायला लागते. जूनच्या सुमारास मिरीला बारीक बारीक केसरं यायला लागतात व जानेवारीमध्ये मिरी काढायला तयार होते. मिरीचे पिकलेले दाणे हे बुलबुल व अन्य पक्ष्यांचे आवडते खाद्य. मिरवेलांना वर्षभर पाणी घालावे लागते.
झाडावरून मिरीचे घोस काढणे, वेटणे, उकळत्या पाण्यात धरणे, सावलीत आठ दिवस वाळवणे अशी काळी मिरी तयार करण्याची दीर्घ प्रक्रिया असते. गावातील दांडे-पंगेरे येथील मच्छिमार समाजाकडून मिरीला स्थानिक मागणी असते. मसाला बनवताना मच्छिमार लोक काळ्या मिरीचा वापर करतात. रोजच्या जेवणात मिरीचा वापर फारसा होत नाही. आमरसात मिरपूड घालून खायची पद्धत गावात आहे. मिरपूड घातल्यामुळे आमरस पोटाला बाधत नाही असे स्थानिक लोक सांगतात.

गावात मिरीचे साधारणतः ८० ते १०० किलो उत्पादन होते. २०२२ साली मिरीला सरासरी ४५० रु. दर मिळाला. गेल्या तीन वर्षांत काळ्या मिरीचा घाऊक बाजारभाव कमी झाला आहे.

Share Tweet Follow Share Email Share