कांगुणी  

(Celastrus paniculatus)

कांगुणी ही अणसुरे गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. शेरीवाडी, वाकी-भराडे इथल्या सड्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या झुडुपांमध्ये क्वचित कुठेतरी ही वेल आढळून येते. किंचित धारदार कडा असलेली लहान आकाराची पाने व द्राक्षासारखे घोस असलेली वाटाण्यासारखी पोपटी फळे यावरून ही वनस्पती ओळखता येते. हिच्या फळांना गावात ‘कांगणं’ असं म्हणतात. फळे पिकल्यावर तडकतात व आतला लाल गर दिसू लागतो. सर्व गावकरी कांगणाचे घोस गणेशोत्सवात मांडवीला सजावटीसाठी बांधतात. या वनस्पतीचा खाद्य, वा औषधी उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. गुरे याची पाने खातात.

 

भारतात सर्वत्र ही वनस्पती आढळून येते. संस्कृतमध्ये हिला ‘ज्योतिष्मती’ असे नाव आहे. आयुर्वेदात ही अत्यंत औषधी वनस्पती म्हणून गणली गेली आहे. याच्या बियांचे विविध औषधी उपयोग आहेत. इंग्रजीमध्ये Black Oil Plant  किंवा Intellect Tree या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. मराठीत ‘मालकांगोणी’ असेही म्हणतात. ही जाड खोडाची उंच वाढणारी वेल आहे.

स्थळ: तेलीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ
गणपती सजावटीसाठी मांडवीला बांधलेली कांगणं , कवंडळ (मध्यभागी) आणि फुलोरा (स्थळ: अणसुरे)
Share Tweet Follow Share Email Share