कवंडळ   

(Trichosanthes tricuspidata)

कवंडळ ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. पूर्वी गावात कवंडळाच्या वेली ठिकठिकाणी आढळायच्या, मात्र अलीकडे काही ठराविक ठिकाणीच दिसतात. कवंडळ हे चेंडूसारखे लालेलाल मोठे फळ असते. ऑगस्ट- सप्टेंबरच्या दरम्यान ही फळे दिसायला लागतात. गणेशोत्सवाचे आणि या फळांचे विशेष नाते आहे. गणेशोत्सवप्रसंगी मंडपीला शोभेसाठी कवंडळे बांधतात. कवंडळांचा खाद्य उपयोग गावात केला जात नाही, मात्र गुरांना विषबाधा झाल्यास कवंडळाचा अर्क असलेले पाणी गुरांना प्यायला देतात असे जुनेजाणते लोक सांगतात. हॉर्नबिल पक्षी कवंडळे अतिआवडीने खातो. मराठीत या फळाला ‘इंद्रायण’ असेही नाव आहे, तर संस्कृतमध्ये ‘महाकाल’ असे म्हणतात. भारतासह उष्ण कटिबंधातील अनेक देशांमध्ये हे आढळते. कवंडळाच्या गराचे विविध आयुर्वेदिक उपयोग सांगितले आहेत. बियांपासून तेल निघते. 

 

 

Share Tweet Follow Share Email Share