केळी 

केळी हे गावातले एक तुरळक प्रमाणात घेतले जाणारे बागायती पीक आहे. केळीची व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणात लागवड गावात होत नाही. घराच्या आजूबाजूच्या जागेत थोड्या प्रमाणात लोक केळीची लागवड करतात. केळीच्या काही गावठी जाती गावात आहेत. बाहेरूनही काही नवीन जाती गावात आणून लावल्या गेल्या आहेत. केवळ भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या केळ्यांची जातही गावात आहे. केळीला रोज नियमितपणे पाणी द्यावे लागते. केळीची सर्वसाधारण उंची १० फुटांपर्यंत असते, मात्र १५ फुटांपर्यंत उंच केळीच्या जातीसुद्धा गावात आहेत. केळीच्या नवीन रोपाला गावात ‘पासांबा’ म्हणतात. नवीन पासांबा लावल्यापासून, रुजल्यापासून वर्षभरात केळ मोठी वाढते व फळधारणा होते. केळफुलाची भाजी गावात आवडीने खाल्ली जाते. घड तयार झाल्यावर आधी केळ तोडून मग घड तोडला जातो. कांडेचोर हा गावात आढळणारा प्राणी घडावरची केळी खातो. उपासाला खास करून लोक केळी खातात. केळ्यांची गावातल्या गावात साधारणतः ३० ते ४० रु. डझन या भावाने खरेदी-विक्री होते. केळीची पानं नैवेद्यासाठी, वा कार्यप्रसंगी जेवण्यासाठी वापरली जातात. केळीच्या खोडाचे बारीक तुकडे करून गुरांना खायला घातले जातात. केळीची सोपे (खोडाच्या सालीचे दोर) मांडव घालताना काठ्या बांधण्यासाठी उपयोगी येतात.

Share Tweet Follow Share Email Share