किंजळ (Terminalia paniculata)
 

किंजळीची मध्यम उंचीची (१० ते ३० मी.) झाडे गावात सर्वत्र सामान्यप्रमाणात आढळतात. उतारावरील जंगलभागात विशेष करून हे झाड आढळते. खोड काळेकुट्ट असून पाने मध्यम आकाराची लांबट असतात. पावसाळा अखेरीस किंजळीला पांढरा मोहोर येतो व त्यामागोमाग लाल रंगाच्या फळांनी झाड बहरते. डिसेंबर ते मे या काळात लालभडक फळलेल्या किंजळी गावात फिरताना दृष्टीस पडतात.
गावात घराच्या बांधकामासाठी विशेष करून किंजळीचा उपयोग केला जातो. किंजळीचे लाकूड आतून लालसर असते. घराचे वासे, आडं, बडोद, रिपा, इंद्राटी, फळ्या, पोटसर, दरवाज्यांच्या चौकटी, इ. भाग बनवण्यासाठी किंजळीचे लाकूड उत्तम!
किंजळीचे मोठे वृक्ष गावात फार तुरळक राहिले आहेत.

भारतात सर्वत्र आढळणारा हा वृक्ष आहे. विशेषतः भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागात (मुंबई ते कन्याकुमारी) किंजळीची झाडे विपुल प्रमाणात आढळतात. खोड काळे, सालयुक्त असते. सालींपासून भरपूर टॅनिन मिळते.

 

मोहोरलेली किंजळ (स्थळ: बौद्धवाडी रस्त्यावरील चक्कीजवळ, नोव्हेंबर २०२२)
किंजळीची लालेलाल फळे (स्थळ - हुर्से सडा, डिसेंबर २०२२ )
किंजळीचे चिरीव वासे (स्थळ: अणसुरे)
Share Tweet Follow Share Email Share