मिरजोळी

(Salvadora persica)    

मिरजोळी ही कांदळवन सहप्रजाती असलेली वनस्पती गावात दांडे-पंगेरे परिसरात सामान्य प्रमाणात आढळते. पंगेऱ्याच्या बांधाच्या कडेने ही वनस्पती दिसते. गुलाबी रंगाच्या पाणीदार फळांच्या द्राक्षासारख्या घोसांवरून ही वनस्पती सहज ओळखता येते. साधारणतः एप्रिल-मे च्या सुमारास ही वनस्पती फळांनी लगडलेली दिसते. सुरुवातीला गुलाबी असलेली फळे नंतर काळी होतात. मिरजोळीच्या फळांचे तेल पूर्वी काढायचे व त्याचा औषधी उपयोग होता असे गावातले लोक सांगतात. अलीकडे मात्र कुठे तेल काढले जात नाही.

मिरजोळीला संस्कृत नाव ‘पीलू’ असे आहे. मराठीत ‘खाकण’ असेही म्हणतात. भारतात आणि जगात विपुल ठिकाणी ही आढळते. कोकणात खाडीकिनारी कांदळाच्या सहवासात ही वाढते. हिच्या फळांचे तेल ‘पीलू ऑइल’ या नावाने बाजारात मिळते आणि ते साबणनिर्मितीमध्ये वापरतात. मिरजोळीच्या बियांमध्ये ३० ते ३५ टक्के तेलांश असतो अशी माहिती मिळते. मिरजोळीची फळे खाद्य असतात. फळांत बुळबुळीत बलक असतो.
दात घासण्यासाठी प्राचीन काळापासून उपयोग होत असल्यामुळे ‘टूथब्रश ट्री’ या नावाने ही वनस्पती जगात परिचित आहे. अरब राष्ट्रांमध्ये हिचा वापर खास करून पूर्वापार होतो. मिरजोळीची मुळे किंवा फांद्या घेऊन त्याने पूर्वी दंतावण   करीत. दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी असलेला याचा औषधी उपयोग जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केला आहे. अलीकडे या वनस्पतीचा अर्क टूथपेस्ट निर्मितीत वापरतात. ‘मेसवाक टूथपेस्ट’ ही याच वनस्पतीच्या अर्कापासून बनवली जाते. म्हणून या वनस्पतीला ‘मेसवाक’ असेही नाव आहे.

संदर्भ –
1)
मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/30149/)
2)
National Library of Medicine (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3249923/)
Share Tweet Follow Share Email Share