मोवईची लहान ते माध्यम उंचीची झाडे गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. मोठे वृक्ष आढळात नाहीत. खोड करड्या रंगाचे असते. पाने लहान, हिरवी व दुतर्फा एकमेकांना समांतर स्वरूपात असतात. उन्हाळ्यात मोवईच्या झाडांना पांढरा मोहोर येतो व त्यामागोमाग तोरणासारखी शेंगदाण्याच्या आकाराएवढी काळपट पांढरी फळे येतात. मोवईची फळे हे अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. फुले-फळे येण्याच्या सुमारास मोवईच्या झाडावर एकही पण शिल्लक राहत नाही. लाकूड हलके व मोठ्या बांधकामासाठी निरुपयोगी असते. खोकापट्टीसाठी मोवईचे लाकूड वापरतात.