नारळ   

नारळ हे गावातले एक मुख्य बागायती पीक आहे. लोकांनी आपल्या घराभोवतीच्या जागेत माडांची मुद्दाम लागवड केलेली आहे, तर खाडीकिनारी अनेक माडाची झाडे आपोआपसुद्धा रुजून आलेली व उंच वाढलेली आढळतात. दांडे-पंगेरे परिसरात माडाची झाडे विपुल प्रमाणात आहेत. झाडाची लागवड समुद्रसपाटीलगतच्या जमिनीत होते. एका बागेत सर्वसाधारणपणे २० ते ४० या प्रमाणात माड आढळतात. जुने माड ५० फुटांपेक्षाही जास्त उंच वाढलेले आहेत. कमी उंचीच्या सिंगापुरी माडांची लागवडही गावात काही ठिकाणी केली गेली आहे. माडांना रोज नियमितपणे पाणी द्यावे लागते. अलीकडे काही लोकांनी माडांवर मिरवेली सोडल्या आहेत. माडावर चढण्यासाठी लोक खाचा पडून ठेवतात.

नारळ हा लोकांच्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. नारळाशिवाय रोजची आमटी-भाजी होऊच शकत नाही इतका नारळ हा गावात आणि कोकणात सगळीकडे लोकप्रिय आहे. शेवया, पुरणपोळी, सांदण अशा अनेक गोड पदार्थांबरोबर नारळाचा रस आवडीने खाल्ला जातो. नारळाच्या वाट्या उन्हात वाळवून त्याचे सुके खोबरे केले जाते. नारळाची भरपूर प्रमाणात लागवड असूनसुद्धा गावात कुठेही खोबऱ्याचे तेल काढले जात नाही. सर्व लोक खोबरेल तेल बाजारातून विकत घेतात. नारळांची गावातल्या गावात खरेदी-विक्री होते. लहान नारळ साधारणतः १५ रु., तर मोठा नारळ २० रु. भावाने विकला जातो. जवळच्या शहरांमध्येही नारळांची विक्री होते.

नारळाच्या किशा भांडी घासण्यासाठी उपयोगी येतात. करवंट्या जाळून टाकल्या जातात. सोडणे पावसाळ्यात धुमी करण्यासाठी उपयोगी येतात. माडाच्या झावळ्यांपासून झापे विणली जातात व ती मांडव घालण्यासाठी उपयोगी येतात. दांडे येथे अजूनही काही लोक झापे विणतात. माडाचे पिढे, पिसुंदऱ्या जळवणासाठी उपयोगी येतात.

पात्यांचा हिर काढण्यासाठी, जळवणासाठी उपयोग
सुखे खोबरे
Share Tweet Follow Share Email Share