सुपारी

सुपारी हे गावातले एक प्रमुख बागायती पीक आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३० फूट उंचीपर्यंतच्या जमिनीत सुपारीचे पीक घेतले जाते. सुपारीची लागवड गावठाण भागात जास्त आहे. सुपारीची गावठी जात गावात आढळते. पूर्ण वाढ झालेल्या पोफळीची उंची ६० फुटांपर्यंत असते. एका सुपारीच्या बागेचे क्षेत्र साधारणपणे ३ ते १० गुंठ्यांपर्यंत असते. बऱ्याच लोकांनी नारळ आणि सुपारीची मिश्र लागवड केलेली आढळते. पोफळींना रोज नियमितपणे पाणी द्यावे लागते. पोफळींवर काळी मिरीचे वेल अलीकडे काही लोकांनी सोडले आहेत.

पावसाळ्यात नवीन सुपाऱ्या धरतात व पिकून पडतात. पिकलेल्या सुपारीची साले वाघळे, चान्या चावतात व त्यामुळे सुपारी खाली पडते. ओली सुपारी व सुखी सुपारी हे गावातल्या लोकांचे आवडते खाद्य आहे. सुपारीची गावातल्या गावात खरेदी-विक्री होते. त्या शेकड्यावर वा किलोवर विकल्या जातात. सध्या सुपारीला २०० रु. शेकडा, वा ३००-४०० रु. किलो एवढा भाव आहे. गावातून बाहेर सुपारी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठवली जात नाही. गावात धार्मिक कार्यांमध्ये सुपारीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

पोफळीच्या झावळ्यांचा मांडवासाठी वा जळवणासाठी उपयोग होतो. विरीपासून ‘खोरी’ बनवतात, जी बारीकसारीक वस्तू ठेवायला उपयोगी पडते. पोफळीचे खोड मांडव घालायला वा बारीकसारीक बांधकामाला उपयोगी येते. गावात काही पोफळींना ‘दक्षिण बाधणे’ हा रोग होतो, मात्र त्याचा उत्पादकतेवर फारसा परिणाम होत नाही.

Share Tweet Follow Share Email Share