वड (Ficus benghalensis)

वडाची झाडे गावात सामान्य प्रमाणात आढळतात. वडाच्या एकूण ५८ महावृक्षांची (३ मीटरपेक्षा जास्त घेर असलेल्या) नोंद अणसुरे गावात झाली आहे. यामध्ये पंगेरेवाडी परिसरात ७, गावठाण भागात ८, शेवडीवाडी-आरेकरवाडी परिसरात २, दांडे-शेरीवाडी-बौद्धवाडी परिसरात २, गिरेश्वर मंदिर परिसरात २, आडीवाडीत ९, भराडेवाडी परिसरात ३, वाकी परिसरात १३ आणि म्हैसासुर-हुर्से परिसरात १२ महावटवृक्षांची नोंद झाली आहे. गावात काही ठराविक वडाची झाडे वटपौर्णिमेला पुजली जातात. ज्या झाडाची मुंज झालेली आहे त्याच झाडाची पूजा करावी अशी पूर्वापार श्रद्धा आहे. दांडे, पंगेरे व गावठाण भागातील महिला गावात दळवीवाडीजवळ असलेल्या वडाची पूजा करतात. बौद्धवाडी रस्ता सुरु होताना असलेल्या वटवृक्षाचीही पूजा केली जाते. गावात वडाच्या पानांचा उपयोग धार्मिक कार्यप्रसंगी प्रसाद देण्यासाठी करतात. वडाच्या नवीन लावलेल्या रोपाचा महावृक्ष होण्यासाठी शंभर-दीडशे वर्षे लागतात. वडाचे झाड सावलीसाठी, गारव्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. गावात आहेत ती वडाची झाडे जपणे व नवीन लावून वाढवणे महत्त्वाचे आहे.

वटवृक्ष - स्थळ: खालची वाकी

वड हा मूळचा अंजीर (Ficus) वर्गातला वृक्ष आहे. या वर्गात ६०० पेक्षा जास्त वनस्पतिप्रकार आहेत. वटवृक्षाला संस्कृत भाषेत ‘न्यग्रोध’ म्हणतात. ‘न्यग्रोध’ म्हणजे वरून खाली वाढणारा. वडाच्या झाडाच्या आडव्या फांद्यांपासून पारंब्या फुटून त्या जमिनीत शिरतात व झाडाचा विस्तार होतो म्हणून त्याला हे नाव दिलं गेलं आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिल्यीय अर्थशास्त्र, रघुवंश इत्यादी अनेक संस्कृत ग्रंथांतून याचा उल्लेख आलेला आहे. बौद्धधर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या सात बोधिवृक्षांपैकी हा एक आहे. वडाचं झाड हा एक यज्ञीय वृक्ष आहे. यज्ञपात्रे याच्याच लाकडाची बनवतात.

‘कृष्णवड’ नावाचा एक वडाचा प्रकार आहे, ज्याची पानं किंचित वाकलेली असल्याने द्रोणासारखी दिसतात. त्याचे शास्त्रीय नाव Ficus krishnae असे आहे. ही वडाची अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. याला ‘माखनकटोरा’ असेही म्हणतात. मात्र ही वडाची स्वतंत्र प्रजाती समजावी का याबाबत अजून पुरेशी स्पष्टता नाही.

“वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ॥” अशी प्रार्थना वटसावित्रीच्या दिवशी करतात. वटवृक्षाच्या विविधांगांमध्ये सावित्री, ब्रह्मदेव, विष्णू, शिव यांचे वास्तव्य असते, असे मानले गेले आहे.

भारतात काही पुरातन वटवृक्ष त्यांच्या धार्मिक महत्त्वांमुळे आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत आणि ते पर्यटकांचं आकर्षण ठरले आहेत. 

देवस्थाने, सार्वजनिक जागा येथे वटवृक्षांची भरपूर प्रमाणात लागवड करणे आणि जपणे शक्य आणि आवश्यक आहे. वडाचा बीजप्रसार हा पक्ष्यांच्या विष्ठेतून होतो. दगडांच्या भेगांमध्ये, झाडांवर, इमारतींच्या सांदडीत वडाच्या बिया रुजून आलेल्या दिसतात. ही रोपे अलगद काढून सुयोग्य जागेत लावता येऊ शकतात.

वडाची पूजा करताना अणसुरे गावातील सुवासिनी स्त्रिया (स्थळ: दळवी वाडी जवळ)
स्थळ: पंगेरेवाडी, छायाचित्र: अनुष्का पंगेरकर
शेरीवाडी येथील वटपूजन (छायाचित्र: विराज कणेरी)
Share Tweet Follow Share Email Share