
अणसुरे गावात धनेश पक्ष्याचे एक घरटे स्थानिक लोकांच्या सहभागातून संरक्षित केले गेले आहे. धनेश (Malabar Pied Hornbill) हा सह्याद्रीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ होत चाललेला पक्षी आहे. या पक्ष्याला घरटे बांधण्यासाठी ढोली असलेल्या मोठ्या वृक्षांची गरज असते. गावात एका रायवळ आंब्याच्या झाडाच्या ढोलीत गेली आठ वर्षे धनेश पक्ष्याची जोडी अंडी घालते आहे. सह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने या घरट्याची नियमितपणे नोंद ठेवली जात आहे.
धनेश पक्ष्याची मादी झाडाच्या ढोलीत अंडी घालते व अंडी उबवण्यासाठी सुमारे २० दिवस ते १ महिना ढोलीत बसून राहते. दरम्यानच्या काळात नर तिला खाद्य आणून भरवतो. स्थानिक लोकांनी हे झाड न तोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या झाडाचे नेमके ठिकाण येथे देण्यात आलेले नाही.