
अणसुरे गावात हुर्से वाडी येथे सुमारे एक किलोमीटर लांबीचा वहाळ आहे. गावाच्या पूर्व बाजूला मुख्य रस्त्यावरून हुर्से वाडी येथे जाणाऱ्या रस्त्याजवळ हा वहाळ सुरु होतो आणि आग्नेय-वायव्य दिशेला वाहत वाहत हुर्शाच्या खाडीत जाऊन संपतो.
वहाळ सुरु झाल्यापासून सुमारे २०० मीटर अंतरापर्यांतचा भाग हा कातळसड्याचा आहे. याभागात वाहाळाची रुंदी सुमारे ५ ते १० फूट आहे. २०० मीटरनंतर डोंगरउतार सुरु होतो व एक छोटी दरी लागते. या दरीचे पात्र ५० फुटांपर्यंत रुंद आहे, तर खोली १० फुटांपेक्षा जास्त आहे. येथे घनदाट जंगल आढळते. रायवळ आंब्याचे ३ महावृक्ष व बेहड्याचा एक महावृक्ष येथे आढळला आहे. याशिवाय कोकराची (Sterculia guttata) मध्यम उंचीची सुमारे १० पेक्षा जास्त झाडे येथे आढळली आहेत. वाटणवेल (Diploclisia glaucescens) ही सह्याद्रीतली एक महत्त्वाची महावेल या दरीत प्रचंड मोठी पसरली आहे. वन्यजीवांसाठी हा खूप मोठा अधिवास आहे. सुमारे ५०० मीटरनंतर वहाळाचे पात्र उथळ व अरुंद होते.
पुढील भागात वहाळाची सरासरी रुंदी १० ते १५ फूट, तर खोली ३ फुटांपर्यंत आहे. पावसाळ्यात हा वहाळ खळखळून वाहतो, तर उन्हाळ्यात कोरडा असतो. या वहाळाच्या बाजूला निरंकारीचे देवस्थान आहे. या भागात मानवी वावर नगण्य आहे.


