
अणसुरे गावात एका ठिकाणी कुसुंबाची राई आहे. ३०-४० फुटांपेक्षा जास्त उंचीचे कुसुंबाचे मोठे वृक्ष या राईत आहेत. सुमारे ३-४ एकरांच्या परिसरात ही राई पसरली आहे. अतिशय तीव्र डोंगरउतार असल्यामुळे येथे मानवी हस्तक्षेप झालेला नाही. म्हणूनच ही राई टिकली आहे. मध्यम व मोठ्या उंचीचे असे ५० पेक्षा जास्त कुसुंबाचे वृक्ष या राईत आहेत. आडीवाडी परिसरात कुसुंबाची झाडं पूर्वी भरपूर होती अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळते. कुसुंबाच्या लाकडाचा उपयोग इमारती वा फर्निचरसाठी केला जायचा. कोकणात हा वृक्ष दुर्मिळ असून गावात असलेल्या या राईचे संरक्षण होणे गरजेचे आहे.
कुसुंब (Schleichera oleosa) हा भारतीय उपखंडातला एक सुंदर दिसणारा वृक्ष आहे. त्याला ‘कोशिंब’ वा ‘कुसुम’ असेही म्हणतात. याचे इंग्रजी नाव Ceylon Oak असे आहे. संस्कृत भाषेत याला ‘मुकुलक’, ‘रक्ताम्र’, ‘लाक्षावृक्ष’ अशी नावं आहेत. भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे, दक्षिण आशियातल्या अनेक देशांमध्ये या वृक्षाचे अस्तित्व आहे. वसंत ऋतूत नवीन पालवी आल्यावर याची पानं बरेच दिवस लाल राहतात आणि पावसाळ्यात हिरवी होऊन निसर्गात मिसळून जातात. लाल पालवी आलेला वृक्ष अतिसुंदर दिसतो. पुढे हिवाळ्यात गळीच्या वेळी ती पिवळी होतात. या झाडाला बारीक पिवळी फुलं येतात. फळं साधारण बोराएवढी, आंबट गर असलेली असतात. माणसांना, तसंच प्राणी-पक्ष्यांना फळं खाद्य आहेत. बियांमध्ये भरपूर तेलाचा अंश असतो. कुसुंबाच्या तेलाची निर्यात करणारा भारत हा एक प्रमुख देश आहे. तेल स्वयंपाकासाठी, केसांवर घालण्यासाठी आणि त्वचेवर लावण्यासाठी उपयोगी असते. याचे लाकूड अत्यंत कठीण असते. फर्निचर आणि इमारती बांधकामासाठी ते उपयोगी पडते. हे झाड लाखेच्या किड्यांचा यजमान वृक्ष (host plant) आहे. मध्य भारतात कुसुंबाच्या झाडांपासून लाख काढली जाते. कुसुंबापासून उत्कृष्ट प्रतीची लाख मिळते व भारतातून ती निर्यात होते.


