डोळी लावणे
पंगेरे खाडीत मुख्य रस्त्यावर एक बांध घातलेला आहे व त्याखाली पाणी जाण्या-येण्यासाठी मोऱ्या बसवलेल्या आहेत. या मोऱ्यांच्या सभोवताल सुमारे ४० फूट रुंदीच्या भागात लाकडी खांब व बांबूच्या काठ्यांचे छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे बांधकाम करून त्याला जाळी बसवलेली आहेत. या रचनेला ‘डोळी लावणे’ असे म्हणतात. दोन खांबांमधले अंतर साधारणतः २ ते ३ फूट असते व प्रत्येक भागात एकेक जाळे लावलेले असते. भरती-ओहोटी सुरु असताना पाणी इकडून तिकडे वाहत असते तेव्हा या जाळ्यात मासे अडकतात. डोळी कोणी लावायची, त्यात अडकलेले मासे कोणी काढून घ्यायचे हे लोक आपापसांत ठरवून घेतात. डोळी ही मुख्यत्वे करून कोळंबी पकडण्यासाठी लावली जाते.

डोळी लावणे

पाग टाकणे


पाग टाकणे
या पद्धतीत एक मोठे जाळे पाण्यात भिरकावतात व त्यात अडकणारे मासे लगेच काढून घेतात. जाळे अचूक भिरकावले जाण्यासाठी आधी ते हातात विशिष्ट पद्धतीने एकवटून घ्यावे लागते. जाळे हातात घेऊन माशांचा थवा कधी जवळ येतोय यावर लक्ष ठेवून राहावे लागते. माशांचा थवा पाण्यात दिसला की लागलीच जाळे भिरकावतात. हे फार कौशल्याचे काम आहे. त्यानंतर जाळे ओढून त्यात अडकलेले मासे काढतात. शेग, काळय, कोकर असे छोट्या आकाराचे मासे या पद्धतीने पकडताना मिळतात.गळाने मासा पकडणे

गळाने मासा पकडणे
ही बहुतांश लोकांकडून नेहमी वापरली जाणारी पद्धत आहे. यात नायलॉनच्या सावेला पुढे गळ असतो. या गळाला कोळंबीसारखा छोटा मासा अडकवून गळ पाण्यात टाकतात. सर्वसाधारणपणे प्रवाहाच्या दिशेने गळ टाकला जातो. गळाला अडकवलेल्या माशाला खायला आलेला मासा स्वतः गळात अडकतो. मासा गळाला लागल्याचे जाणवल्यावर पटापट साव ओढून घ्यावी लागते. तांबवशीसारखे मोठे मासे या पद्धतीने पकडताना सर्रास मिळतात. अलीकडे प्लास्टिकचे रंगीबेरंगी व पेटता लाईट असलेले मासे गळाला लावतात.

वाण लावणे


वाण लावणे
खाडीच्या आतल्या भागात उथळ पाण्यात वापरली जाणारी ही पद्धत आहे. या पद्धतीत सुमारे १० ते २० फूट त्रिज्येच्या अंतरावर वर्तुळाकार बांबूच्या काठ्या खोचून त्याला जाळे अडकवतात. गोलाकार जाळे अडकवल्यानंतर मधल्या भागात पाण्याच्या पृष्ठभागावर काठीने जोरजोरात बडवतात. यामुळे मासे सैरावैरा पळायला लागतात व पळता पळता जाळ्यात अडकतात. बराच वेळ ही क्रिया केल्यानंतर वाण काढून घेतात.चिंगळं रापणे

चिंगळं रापणे
‘चिंगळं’ नावाचे एकदम छोट्या आकाराचे मासे खाडीत भरपूर प्रमाणात आढळतात. खाडीच्या आतल्या भागात, जिथे प्रवाह अरुंद आहे अशा भागांमध्ये खास करून चिंगळं रापण्याचे (पकडण्याचे) काम चालते. प्रवाह मंद असताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ओणवे राहून छोटे जाळे लावून धरले जाते व त्यात चिंगळं पकडली जातात. बराच वेळ, दोन-तीन तास अशा प्रकारे जाळी लावून धरावी लागते. या जाळीला स्थानिक भाषेत ‘पागलं’ म्हणतात. चिंगळं रापण्याचं काम खास करून महिला करतात.
कालवं बोचणे



कालवं बोचणे
अणसुरे खाडीत शिंपले मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांना स्थानिक भाषेत ‘खरपं’ असे म्हणतात. या खरपांमध्ये जो प्राणी असतो त्याला स्थानिक भाषेत ‘कालवं’ म्हणतात. ही कालवं हा गावातल्या बहुतांश लोकांच्या रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे. ओहोटीच्या वेळी खाडीत जाऊन कोयतीच्या सहाय्याने खरपांमधून कालवं काढणे याला ‘कालवं बोचणे’ असे म्हणतात. हे काम खास करून महिला करतात. ओहोटीच्या वेळी वाडीतल्या महिला एकत्र कालवं बोचायला जातात, ज्याला ‘न्हईत जाणे’ असे म्हणतात. ढोपरभर चिखलात ओणवं राहून कालवं बोचणे हे कष्टाचे काम असते.
खेकडे पकडणे
