
अणसुरे गावात साध्या पद्धतीने रोजचा पाऊस मोजण्याचा उपक्रम २०२१ च्या पावसाळ्यात करण्यात आला. पाऊस हा पर्जन्यमापकात मोजतात. हे पर्जन्यमापक अतिशय साध्या पद्धतीने घरच्या घरी तयार करता येऊ शकते. एक दंडगोलाकृती स्टीलचा डबा घ्यायचा व तो पूर्ण मोकळ्या जागेत ठेवून द्यायचा, जेणेकरून पावसाचे पाणी थेट डब्यात पडेल. रोज सकाळी ७ वाजता व सायंकाळी ७ वाजता, म्हणजेच १२ तासांच्या फरकाने डब्यात जमा होणाऱ्या पाण्याची उंची पट्टीने मोजायची. पाण्याची उंची जेवढी भरेल तेवढे मिलीमीटर पाऊस झाला असे समजावे. यात एक गमतीची आणि आश्चर्याची वैज्ञानिक बाब म्हणजे डब्याचा आकार कितीही छोटा किंवा मोठा असला तरी पाण्याची उंची बदलत नाही. या पद्धतीने २०२१ च्या जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत रोज पाऊस मोजून त्याची नोंद ठेवण्यात आली. या नोंदीचा तक्ता पुढे दिला आहे.


२०२१ च्या पावसाळ्यातील गावातील एकूण पाऊस (जून ते ऑक्टोबर) - ३४७१ मिमी
या तक्त्यावरून पुढील निरीक्षणे आपल्याला मिळतात.
१) पावसाची नियमित सुरुवात दि. ७ जून रोजी झाली.
२) सर्वांत जास्त पाऊस जुलै महिन्यामध्ये (१४३२ मिमी), तर सर्वांत कमी पाऊस ऑक्टोबर महिन्यात (२८ मिमी) झाला.
३) एकूण झालेल्या ३४७१ मिमी पावसापैकी जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्येच २४७१ मिमी पाऊस पडला व ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये १००० मिमी पाऊस झाला. म्हणजेच, एकूण पावसापैकी सुमारे ७१% पाऊस जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये झाला व ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये फक्त २९ टक्के पाऊस झाला.
४) दि. ७ जून ते ११ जून या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. १२ जून ते १६ जून या काळात प्रचंड पाऊस पडला. १७ ते १९ जून याकाळात पावसाची तीव्रता थोडी कमी झाली. २० जून ते १० जुलै या दरम्यान तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. ११ ते २२ जुलै यादरम्यान पुन्हा प्रचंड मुसळधार पाऊस पडला. २३ जुलै ते ३ सप्टेंबर या दीर्घ कालावधीत पाऊस तुरळक (दिवसाला ५० मिमी पेक्षा कमी) होता. ४ ते ६ सप्टेंबर हे तीन दिवस मुसळधार पावसाचे होते. त्यानंतर पाऊस हळूहळू कमी होत गेला. ऑक्टोबर महिन्यात ६ व ७ तारखेला थोडा पाऊस पडला.
५) सर्वाधिक पाऊस हा दि. १३ जून रोजी पडला (२४ तासांत एकूण २३१ मिमी). त्याखालोखाल दि. १८ जुलै रोजी पडला (२१६ मिमी.) त्याचबरोबर दि. १२ जून (१६० मिमी), दि. १२ जुलै (११२ मिमी), १५ जुलै (१०२ मिमी) हे अतिमुसळधार पावसाचे दिवस होते.
६) जून महिन्यात १७, जुलै महिन्यात १०, ऑगस्ट महिन्यात १६, तर सप्टेंबर महिन्यात १२ दिवस अगदी तुरळक पावसाचे (२४ तासांत १० मिमी पेक्षा कमी) गेले.
(टीप: यात ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे मे महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी मोजलेली नाही.)