
अणसुरे गावात वाकीच्या सड्यावरून सुरु होऊन भराडेवाडीच्या मळ्यात वाहत जाणारा एक मोठा वहाळ आहे. वहाळाची लांबी सुमारे पावणेदोन किलोमीटर, सरासरी रुंदी १५ फूट, तर सरासरी खोली ३ फूट आहे.
गावाच्या मुख्य रस्त्यावरून वाकीकडे जाणाऱ्या फाट्याला उजवीकडे वळल्यावर एक मोरी लागते तिथे हा वहाळ सुरु होतो. हा वहाळ नैऋत्य-ईशान्य दिशेने वाहत अणसुरे गावाच्या दक्षिण दिशेकडच्या खाडीला जाऊन मिळतो.
उगमापासून सुमारे ३०० मीटरपर्यंतचा भाग हा सड्यावरचा आहे. त्यानंतर एक छोटी दरी लागते व तेथून हा वहाळ भराडेवाडीच्या दिशेने उतरायला सुरुवात होते. या दरीत मोठे काळे खडक आहेत. वहाळाच्या दुतर्फा झुडुपी जंगल आहे. पावसाळ्यात हा वहाळ खळखळून वाहतो व उन्हाळ्यात कोरडा असतो.
भराडीण देवीच्या देवळाजवळ या वहाळात काही डबकी तयार झाली आहेत तेथे उन्हाळ्यातही पाणी असते.
या वहाळाच्या कडेने अनेक जंगली झाडे व महावेली आहेत. ‘वाटणवेल’ (Diploclisia glaucescens) ही सह्याद्रीतली एक अत्यंत महत्त्वाची असलेली वनस्पती या वहाळात आढळते. ‘शिरस’ (Vitex leucoxylon) हे गावात इतरत्र कुठेही न आढळलेले दुर्मिळ झाडही या वहाळात आढळते.
भराडेवाडीतील लोक या वहाळात गणेश विसर्जन करतात. माणसांसाठी आणि वन्यजीवांसाठी हा वहाळ ही महत्त्वाची परिसंस्था आहे.

वहाळाचे स्थान व दिशा - उपग्रह छायाचित्र

शेरस – वहाळात आढळणारे दुर्मिळ झाड

वाटणवेल – वहाळात आढळणारी महावेल

वहाळातल्या मोठया खडकांमध्ये रांजणखळग्यांसारखे आकार तयार झालेले दिसतात.

वहाळातली डबकी